मुंबई : बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू हे अपक्ष आमदार सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. अचलपूर मतदार संघातून त्यांनी काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आणि शिवसेनेचे सुनीता फिस्के यांचा त्यांनी पराभव केला. बच्चू कडु यांना ८१ हजार २५२ मतं मिळाली. पण हा विजय दिसतो तितका सोपा नव्हता. यासंदर्भात बच्चू कडू यांनी 'झी २४ तास'ला माहिती दिली. यावेळेस सहा उमेदवारांसोबत त्यांची एकाच वेळी लढत होती. त्यामुळे मोठे आव्हान होते असे त्यांनी सांगितले.
मागच्या वेळेस जे सहा उमेदवार होते ते यावेळेस एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे सहा विरुद्ध एक अशी लढत होती. प्रत्येक गावात आमचा एक कार्यकर्ता सहा जणांच्या विरोधात लढला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन तो लढला.या मतदार संघात जातीधर्माचा विषय ताकदीने आणला, पैशांचा वापर खूप झाला. पण आमचा झेंडा हा मतदार संघाच्या विकासासाठी आणि सामान्याच्या विकासाचा आहे. आमच्याकडे कोणत्या धर्माचा झेंडा नव्हता. तरीही हे यश मिळाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.
जसं अभिमन्यूला घेरलं तसं आम्हाला घेरण्याचा प्रयत्न झाला. पण सामान्य कार्यकर्त्यांनी हे चक्रव्यूह भेदलं. आणि ९ हजार मतांनी मी जिंकून आलो. प्रजा ही राजा आहे त्यामुळे राजापर्यंत योजना नेण्याचे काम आम्ही केले. बऱ्याचदा लोक अपप्रचाराला बळी पडतात. पण विजय हा विजय असतो. पण मी अतिशय प्रामाणिकपण देशभरात अपंगांची लढाई लढलो, शेतकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न नेल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.