काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 24, 2024, 07:53 AM IST
काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत? title=
Maharashtra Assembly Election 2024 Vandre East contest may see Zeeshan Siddique NCP face Varun Sardesai

Maharashtra Vidhan Sabha Election: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानेही पहिली यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी एकूण 65 जणांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. तसंच, अनेक नवीन चेहरेही शिवसेनेने रिंगणात उतरवले आहेत. वरुण सरदेसाई पहिल्यांदा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत, तर, ठाण्यातून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना तिकिट दिलं आहे. 2019 साली या मतदारसंघातून काँग्रेसने झीशान सिद्दीकी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वीच झीशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळं राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात आता वरुण सरदेसाई आणि झीशान सिद्दीकी यांच्यात लढत होणार असं चित्र आहे. 

दरम्यान, वांद्रे पूर्व मतदारसंघ ही काँग्रेसची जागा असूनही ठाकरेंनी वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली त्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. तसंच, चांदीवलीची जागा ही शिवसेनेची असूनदेखील त्यांनी तिथे उमेदवार जाहीर केलेला नाही. चांदिवली येथून काँग्रेसचे नसीम खान निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि ठाकरेंनी या दोन्ही जागा स्वाईप केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. 

वांद्रे पूर्व येथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून वरूण सरदेसाई तर चांदीवली येथून नसीम खान हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.  दरम्यान, ठाकरे गटाने वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरून सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे विद्यमान आमदार झीशान सिद्दिकी यांनी ट्विट केले आहे. 

असं ऐकलंय की,  जुन्या मित्रांनी वांद्रे पूर्वमधून उमेदवाराची घोषणा केली आहे. साथ निभावणं तर कधी त्यांच्या स्वभावात नव्हतंच, आता जनता निर्णय घेईल, असं झीशान सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तसंच, त्यांनी एक शेरदेखील ट्विट केला आहे. 

“रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे, 
मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं।”