Eknath Shinde On Manjor Jarange Patil Comment About PM Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानपरिषदेमध्ये मनोज जरांगे पाटलांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेली विधान चुकीची असल्याचं अधोरेखित करतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुकही केलं. जरांगे पाटलांनी अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा संदर्भ मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या निवेदनामध्ये केला. त्यावेळेस सभागृहातील सत्ताधारी सदस्यांनी आवाज करत जरांगे मोदींबद्दल सुद्धा बोलल्याचंही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं. हाच मुद्दा घेत मुख्यमंत्र्यांंनी पंतप्रधान मोदींनी देशाचं नाव जगभरात केल्याचं मत व्यक्त केलं.
आपले सरकार कायद्याच्या चौकटीत न बसणारा कोणताही निर्णय घेणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात दिला. मनोज जरांगे पाटलांनी अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरही शिंदेंनी आक्षेप नोंदवला. मात्र अशापद्धतीची विधान आणि कायद्याचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. "कायदा सगळ्यांना समान असावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. मुख्यमंत्री असेल तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्याचं उल्लंघन कोणालाही करता येणार नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले. जरांगेंच्या भाषेवर आक्षेप घेताना मुख्यमंत्र्यांनी, "काय भाषा? हे करुन टाका? हे करुन टाका, ते करा. गाव बंद करा. काय हे? असं कधी झालं होतं आपल्याकडे?" असा सवाल उपस्थित केला.
नक्की वाचा >> मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश
"आपल्या महाराष्ट्रात एक परंपरा आहे. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे," असं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं असता इतर सत्ताधारी सदस्यांनी जरांगेनी पंतप्रधानांबद्दलही विधान केल्याचं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच संदर्भातून मुख्यमंत्र्यांनी, "या देशाचे पंतप्रधानमंत्री मोदी साहेबांनी जगामध्ये नाव केलं. आज आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आम्ही जगभरात जातो तेव्हा मोदींच्या नावे आपल्या देशाबद्दल सन्मानाने, आदराने बोललं जातं," असं म्हणत मोदींचे गुणगाण गायलं.
नक्की वाचा >> "माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर..'; CM शिंदेंकडून जरांगेंचा एकेरी उल्लेख
"पूर्वी भारत बोलला की कोणी लक्ष देत नव्हतं. आज भारत बोलला की जग लक्ष देतंय. त्याचं कारण जपलेलं संबंध. कोवीडच्या काळात, इतर वेळी केलेली मदत असेल. आता तुम्ही म्हणताय की मोदींबद्दल चांगलं बोलतो. आता चांगलं केलं तर चांगलं बोलणार. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं बोला. चांगल्याला चांगलं बोलण्याची आमची सवय आहे. वाईटाला धडा शिकवण्याचं शिवलेलं आहे. मोदीसाहेबांबद्दल असे उद्गार काढणं शोभतं का? एका मार्यादेपर्यंत आपण सहन करु शकतो," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नक्की वाचा >> 'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'
"जेव्हा वाटलं की यांच्या (जरांगेंच्या) बोलण्याला, भाषेला राजकीय वास येतोय असं वाटलं तेव्हा मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून इतर समाजांची जबाबदारी आपली आहे. तुमच्याबरोबर काही झालं तरी सरकार तुमच्यापाठीशी उभं राहील," असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींची सभा उधळवून लावू अशापद्धतीचं विधान काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भातील इशारा देताना केलं होतं. यावरुन विधानसभेमध्ये आमदार आशिष शेलार यांनीही आज आक्षेप घेतला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उधळून लावू म्हणतात, पण तुम्ही आहात कोण असा माझा सवाल आहे," असं शेलार म्हणाले. कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठून आले? हे समोर आलं पाहिजे असं आशिष शेलार म्हणाले. अंतरावली सारटी दगडफेक प्रकरणी एसआयटी लावा अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर एसआयटी चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले.