APMC Election Results : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर

Maharashtra APMC Election Results 2023 : राज्यभरात मविआ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतोय.. तर दुसरीकडे साताऱ्याच्या मेढा बाजार समितीत वेगळंच समीकरण पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2023, 04:43 PM IST
APMC Election Results  : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर title=

Maharashtra APMC Election Results 2023 : राज्यभरात मविआ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतोय.. तर दुसरीकडे साता-याच्या मेढा बाजार समितीत वेगळंच समीकरण पाहायला मिळालं.. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनेलने एकहाती विजय मिळवलाय.. बाजार समितीच्या अठरापैकी अठराही जागा त्यांनी जिंकून घेतल्यात.. 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर आता उरलेल्या बाराही जागांवर शेतकरी विकास पॅनेल विजयी झालंय. तेव्हा दुस-या गटातले राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार आणि ठाकरे गटाचे नेते सदाशिव सपकाळ गटाला मात्र हार पत्करावी लागलीय. Maharashtra APMC Election Results LIVE Updates : पाहा विभागवार निकाल, अनेकांना जोरदार धक्का

भाजप खासदार रक्षा खडसेंना मोठा धक्का

जळगावमधील रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे याचं वर्चस्व दिसून आलंय. एकनाथ खडसेंनी आपल्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसेंना मोठा धक्का दिलाय.. रावेर बाजार समितीत महाविकास आघाडी पॅनलचे 9 उमेदवार विजयी झालेत.  तर भाजप शिवसेना युतीचा फक्त एकच उमेदवार विजयी झाला आहे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारलीय. अजून सात जागांचे निकाल येणं बाकी आहे.

मंत्री दादा भुसे यांना जोरदार झटका

मालेगाव बाजार समितीच्या सोसायटी गटात पालकमंत्री दादा भुसे यांना धक्का लागण्याची शक्यता आहे. बहुतांशी जागांवर ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. अद्वय हिरे मतदान मोजणी कक्षात दाखल झालेत. येथे हिरे समर्थकांची  जल्लोष व जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

रायगडात महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता 

अलिबाग बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवलीय. सर्व १८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. याआधी ७ जागा मविआने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या सर्व ११ जागा मविआने जिंकल्या. अलिबाग बाजार समितीत प्रवेश करण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न फसला

धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का

बाजार समितीच्या निवडणुकीत बीडमधून मोठी बातमी. प्रतिष्ठेच्या अंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. आंबाजोगाईत मुंडे बहिण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली मविआने दणदणीत विजय मिळवलाय.. एकूण 18 जागांपैकी 15 जागांवर मविआने बाजी मारलीय. तर भाजपला फक्त तीनच जागांवर विजय मिळालाय.. पंकजा मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावतीत महाविकास आघाडीची बाजी

अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मविआनं आघाडी मिळवलीय. तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात 18 पैकी 18 उमेदवार निवडून आलेत. चांदूर रेल्वेत 18 पैकी 17 उमेदवार निवडून आलेत. या ठिकाणी भाजपला एका ठिकाणी समाधान मानावे लागले. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पॅनलचा पराभव झालाय. इथं मविआचे 10 उमेदवार विजयी झालेत. नांदगाव खंडेश्वरमध्ये अपक्ष अभिजित ढेपे यांच्या गटाचे 18 पैकी 11 उमेदवार निवडून आलेत.  अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेसनं विजय मिळवलाय.

रवी राणा आणि भाजपला मोठा धक्का

मरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत रवी राणा आणि भाजपला मोठा धक्का बसलाय...रवी राणांचे मोठे भाऊ सुनील राणा यांचा पराभव झालाय...अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर यशोमती ठाकूर यांची सत्ता आली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाच्या 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे.

नाना पटोले यांना होमपिचवर मोठा धक्का ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना होमपिचवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसला आतापर्यंत केवळ चार जागांवर विजय मिळाला. तर  राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटानं 7 जागांवर विजय मिळविलाय. पटोले यांच्या मतदारसंघातील लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप युतीने तब्बल आठ जागा जिंकल्या असून काँग्रेसला केवळ आतापर्यंत तीन जागांवर विजय मिळालाय. भंडारा आणि लाखनी तालुक्याचा विचार करता 36 जागांपैकी आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना युतीने 15 जागांवर विजय मिळविला तर, काँग्रेस केवळ सात जागांवरच पोहोचलीय.

बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला 

भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी भाजप, शिवसेना दोन्ही गट, भाजपला धोबीपछाड दिलाय. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भोरमध्ये मोठा जल्लोष साजरा केला. पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहे. बारामतीर राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे  पॅनल आघाडीवर होते. तर दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांचं पॅनेल आघाडीवर होते. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणबाजी.

परभणीत धक्कादायक निकाल

परभणीच्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेर मतमोजणीवरून गोंधळ झालाय. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोश मुरकुटे यांचे वडील त्र्यंबक मुरकुटे यांचा 6 मतांनी पराभव झालाय, त्यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला असता फेर मतमोजणी घेण्यात आली, यावेळी एका मतदानाच्या चिठ्ठीवर शिक्का आढळला नसल्याचा आरोप करीत येथे गोंधळ घातला,यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यंत्रणेला धारेवर धरले होते. 

संभाजीनगरात भाजप आणि शिंदे गटाचा झेंडा 

 संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. 15 पैकी 11 जागांवर भाजप आणि शिवसेना युतीने विजय मिळवलाय. तर महाविकास आघाडीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. हरिभाऊ बागडेंनी माजी आमदार कल्याण काळेंना धक्का दिलाय. या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर विजयी जल्लोष करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातल्या बाजार समितीवर महाविकास आघाडी

धाराशिव जिल्ह्यातल्या बाजार समितीवर महाविकास आघाडीनंच आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.  कळंब, वाशी ,परंडा ,मुरूम आणि उमरगा या पाच बाजार समितींवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे... तर धाराशिव, तुळजापूर आणि भूम या तीन बाजार समित्या सेना-भाजप युतीकडे गेल्यात. पंरड्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलला 18 पैकी केवळ पाच जागेवर विजय मिळवता आला .तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांना धाराशिवमध्ये धक्का बसलाय. भाजपाचे 18 पैकी 17 उमेदवार विजयी झाले असून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केलीय. 

विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीचा धुव्वा 

सांगली जिल्ह्यातल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडालाय. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केला. १८ पैकी एकही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी विरोधात पॅनेल उभं केलं होतं. 

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व 

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलंय. माजी आमदार प्रशांत परिचारक गटाच्या पॅनलनं 18 पैकी 18 जागांवर आघाडी घेतलीय. परिचारक गटाच्या पॅनलनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. 18 पैकी 5 जागावर भाजप बिनविरोध निवडून आली होती. 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागेवरही भाजपनं वर्चस्व कायम राखलंय. 

पिंपळगाव गावात राष्ट्रवादीची बाजी 

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारलीय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनेलला 11 जागांवर विजय मिळाला.. तर ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनेलला फक्त सहाच जागांवर विजय मिळवता आला.. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम विजयी ठरलेत.