महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, स्थानिक गावकरी बनले देवदूत

पुराच्या पाण्यात अडकलेली असताना स्थानिक गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने बचावकार्य केले.  

Updated: Jul 27, 2019, 11:03 PM IST
महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, स्थानिक गावकरी बनले देवदूत title=

बदलापूर : मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर - वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकलेली असताना स्थानिक गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने बचावकार्य केले. एकीकडे रेल्वे प्रशासनसुस्त असताना गावकरी मात्र देवदूत बनून आले. या गावकऱ्यांनी सरकारी मदतीची वाट पाहिली नाही. जिवावर उदार होऊन रेल्वे प्रवाशांसाठी बचावकार्य राबवले. प्रशासनाकडून मात्र रात्रभर आश्वासने मिळत होती. अखेर स्थानिक मदतीला आले आणि जिवावर उदार होऊन त्यांनी प्रवाशांचा जीव वाचवला. 

रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी 

या घटनेमध्ये रेल्वेच्या उदासिन कारभाराबरोबरच रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतके पाणी रेल्वेरुळांवर आलेले असताना महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे गेलीच कशी? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केलाय. पाणी साचल्याची माहिती नव्हती का? आणि जर माहिती होती तर एक्स्प्रेस पुढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात का घातला असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावरून मदतीचे आश्वासन देणाऱ्या रेल्वे व्यवस्थापनाने रेल्वे प्रवाशांना मदत करण्यास उशीर का लावला असा प्रश्नही संतप्त प्रवाशांनी केला. रेल्वेच्या एकूण कारभाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. हा सगळा प्रकार 'झी २४ तास'ने रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या कानावर घातला असता त्यांनी याबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.