Mhada Lottery : हक्काचं घर घेताना आर्थिक जुळवाजुवळ करणं अनेकांनाच वेठीस आणतं. अनामत रकमेपासून घराचे हफ्ते जाईपर्यंत प्रत्येक वेळी ही आर्थिक बाजू सावरून नेणं म्हणजे मोठं जिकरीचं काम वाटू लागतं. हीच आव्हानं पेलण्यासाठी काही संस्थांची मोठी मदत होते. म्हाडा त्यातलीच एक संस्था. मुंबई, पुणे आणि इतर अनेक भागांमध्ये उपब्ध भूखंडांवर इमारती उभारत तिथं बांधलेल्या घरांची उपलब्धता म्हाडाकडून सामान्यांसाठी करून दिली जाते.
म्हाडाची मुंबईसाठीची सोडत येत्या काळात जाहीर होणार असून, तूर्तास पुण्यासाठीची एक सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पण, सोडतीसाठीच्या इच्छुकांची एकूण संख्या पाहता सध्याची उपलब्ध गृहसंख्या पुरेशी नाही, ही बाब म्हाडानं ओळखत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
थोडक्यात पुणे म्हाडाची दुसरी सोडत लवकरच काढली जाणारे आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. बुधवारी, 18 जुलै 2024 ला पुणे म्हाडाची 4 हजार 850 घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीत ज्यांना घर मिळणार नाही त्यांना दुसऱ्या सोडतीत संधी मिळणारे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं म्हाडानं मनावर घेतल्यामुळं आता अनेक इच्छुकांना हक्काच्या घराचं स्वप्न साकार करता येणार आहे.
म्हाडाच्या वतीनं येत्या काळात सुमारे 7500 घरांची मेगासोडत काढली जाणार असून, यामध्ये कोकण, पुणे आणि मुंबई मंडळांचा समावेश आहे. म्हाडाच्या घरांना असणारी मागणी आणि सामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता वर्षातून किमान एकदातरी म्हाडाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्याच वतीनं काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. त्यामुळं आता म्हाडाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे अनेकांचच लक्ष लागलेलं आहे.
इथं पुणेकरांसाठी म्हाडानं आनंदाची बातमी दिलेली असतानाच तिथं मुंबईच्या डबावाला संघटनेच्या वतीनं म्हाडा सोडतीमध्ये 10 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. ज्याचा परिणाम जनरल प्रवर्गावर होऊ शकतो. याशिवाय येत्या काळात म्हाडाकडून घरांच्या दरात साधारण 15 ते 50 टक्क्यांनी वाढ होण्याचीसुद्धा शक्यता असून, आता ही वाढ नेमकी किती फरकानं होते याच्या अधिकृत वृत्ताकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.