रायगड : रायगडमधील इमारत दुर्घटनेत आणखी एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. महिरुनिसा काझी असं या 62 वर्षीय महिलेचे नाव आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी येथील उपस्थितांनी महिलेला सुखरुप बाहेर काढल्यानंतर टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी 5 मजली इमारत कोसळली होती. ज्यामध्ये अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीचे बिल्डर फारुक काझी आणि युनूस शेख याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ६० हून अधिक जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर 10 ते 15 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एनडीआरएफच्या तीन टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशासन आणि सर्व यंत्रणांकडून घटनास्थळी गेल्या 27 तासांपासून बचावकार्य सुरु आहे.