महाड इमारत दुर्घटना : आर.सी.सी. सल्लागार बाहूबली धामणेला अटक

महाड इमारत दुर्घटना प्रकरणात पहिली अटक

Updated: Aug 26, 2020, 05:03 PM IST
महाड इमारत दुर्घटना : आर.सी.सी. सल्लागार बाहूबली धामणेला अटक title=

रायगड : महाड इमारत दुर्घटना प्रकरणात पहिली अटक झाली आहे. आर.सी.सी. सल्लागार बाहूबली धामणेला पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतून पोलिसांनी धामणेला ताब्यात घेतलं आहे. इमारत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर रायगड पोलिासांची धडक कारवाईला सुरुवात केली आहे. बाहूबली धामणे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी धामणेला माणगावच्या जिल्हा सत्र न्यायालयाने नेले. यामुळे न्यायालयाने धामणेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महाड इमारत दुर्घटना प्रकरणात मदत व बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

२४ ऑगस्टला संध्याकाळ साडेसहाच्या दरम्यान तारिक गार्डन ही ५ मजली इमारत कोसळली होती. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या इमारतीत 41 कुटुंब राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत पडली. या दुर्घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. तसेच मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल असं ही त्यांनी म्हटलं आहे.

महाड इमारत दुर्घटनेत दोषी बिल्डरवर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस अधीक्षकांना केल्या असल्याचं मंत्री उद्य सामंत यांनी म्हटलं आहे.