मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार ५० वर्ष चालेल असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी हे सरकार ५० दिवसही चालणार नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. यवतमाळ मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात भाजप सेनेचे सरकार स्थापन व्हावे अशी आपली इच्छा असून सावरकर प्रेमी शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेसने काढावा आणि शिवसेनेने सावरकर विरोधी काँग्रेस च्या पाठिंब्यावर सरकार चालवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.
हे सरकार पाच वर्षंच काय, पुढची २५ वर्षं टिकेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागपुरात दिली होती. नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या नागपुरातल्या आगमनानंतर नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला ही चांगली गोष्ट आहे. पण आता पाऊस नको रे बाबा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याची शक्यता आहे.