आशिष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या तळोधी गावातील महिलांच्या जिद्दीने एका नव्या पर्वाला सुरुवात केलीय.. अगदी छोटं काम होतं... महिला एकत्र आल्या आणि नेटानं सुरू केलं... त्यामुळे महिलांना चार पैसे मिळाले, गावचा विकास झाला, शेतक-यांचाही फायदा झाला...
कच-याचं करायचं काय ? यावर उत्तम उपाय शोधलाय गडचिरोलीतल्या महिलांनी. गडचिरोलीतलं तळोधी हे आदिवासीबहुल गाव. या गावात साडे तीन लाख रुपये खर्च करुन बांधलेल्या कचरा टाक्या धूळ खात पडल्या होत्या. त्याचा ताबा महिलांनी घेतला. त्याचवेळी जिल्ह्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाची बैठक या गावात पार पडली. यात या महिलांनी या निरुपयोगी टाक्यांचा विषय मांडला.
या टाक्यांमध्ये खतनिर्मिती प्रकल्पाची कल्पना पुढे आली... तेव्हापासून तळोधी गावची नारीशक्ती झपाट्यानं कामाला लागलीय. कच-यापासून खतनिर्मितीचं रीतसर प्रशिक्षण महिलांना देण्यात आलं. घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचा, कच-यावर प्रक्रिया करायची आणि त्यापासून खतनिर्मिती असा प्रकल्प आकाराला आला. सध्या या प्रकल्पाचं कौतुक होतंय.
गडचिरोलीच्या या दुर्गम चामोर्शी तालुक्यातील तळोधी गावात हा प्रकल्प केवळ गाव स्वच्छ ठेवणे यापुरताच मर्यादित नाही. याला इतर गावांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणूनही मान्यता मिळाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांनी गावातल्या महिलांना यासाठी प्रोत्साहन दिलं... या खतनिर्मिती केंद्राची उलाढाल एका वर्षात सुमारे ३ लाखांवर गेलीय.... महत्त्वाचं म्हणजे यातून रोजगार निर्मिती झाल्याने महिलांना हा प्रकल्प फायद्याचा ठरलाय.
या खत निर्मिती प्रकल्पातून निघालेल्या खताचा दर्जा उत्तम आहे... या खताचा तेजस्विनी नावाचा ब्रँड तयार करण्यात आलाय. त्य़ाला बाजारात चांगली मागणी आहे....या प्रकल्पामुळे शेतक-यांनाही जैविक खत सहज उपलब्ध झालंय.
या प्रकल्पामुळे गावही स्वच्छ झालं आणि खतही उपलब्ध झालं... हे सगळं करुन दाखवणा-या गावातल्या नारीशक्तीचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या उपक्रमांना शुभेच्छा.