मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय

लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे. 

Updated: Jun 5, 2024, 03:39 PM IST
मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय title=

Marathwada Manoj Jarange Factor : लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. यात एनडीएला 292 जागा, इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. तर 17 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला. महाराष्ट्रात महाविकासआघाडीला 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र पार पडत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे. 

यंदाच्या निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर या निवडणुकात चांगलाच चालला असल्याची चर्चा रंगली आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर जरांगे यांनी महायुती विरोधात प्रचार केला, असे बोललं जात आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधी उमेदवाराला फायदा झाल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी संभाजीनगर वगळता सातही जागा जिंकणाऱ्या युतीला यावेळी संभाजीनगर वगळता एकही जागा जिंकता आलेली नाही. 

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैर विरुद्ध संदीपान भुमरे यांच्यात लढत झाली. यात संदीपान भुमरे यांचा विजय झाला. संदीपान भुमरे यांनी जरांगे यांचे उपोषण सोडवण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. त्याचा फायदा भुमरे यांना झाला. त्याशिवाय भुमरे मराठा उमेदवार होते. त्यामुळे जरांगे यांनी विरोधी भूमिका घेतली नाही.  

पंकजा मुंडेंनाही फटका

जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत झाली. यात काँग्रेसचे कल्याण काळे विजयी ठरले. जालना हे मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू होते. त्यात जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकाही केली होती. त्यामुळे मराठा मतांचा मोठा फटका रावसाहेब दानवेंना बसला. तर बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत झाली. बीडमधील ही लढत सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी अशी होती. या ठिकाणी मतांचे खूप जास्त ध्रुवीकरण झाले. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसला. पंकजा मुंडे यांचा अल्प मताने पराभव झाला. तर बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार विजयी झाले. 

मराठवाड्यात भाजपविरोधी मतदान

नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत झाली. यात वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारावेळी अशोक चव्हाणांना मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा विरोध सहन करावा लागला. त्यावेळी चिखलीकर यांची गाडीही फोडण्यात आली होती. त्यामुळे मराठवाड्यात भाजपविरोधात मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्येही मराठा समाजाने भाजपविरोधी उमेदवाराला साथ दिली. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने घेतलेली फडणवीस विरोधी भूमिका, फडणवीस आणि भाजपबद्दल असलेला रोष मराठा समाजांनी मनावर घेतला. त्यामुळे भाजपविरोधी मोठ्या प्रमाणात मतदान केले.