'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..'

Raj Thackeray Party Reacts On BJP MNS Alliance: मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घरी रात्री मनसे नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 7, 2024, 01:30 PM IST
'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..' title=
भेटीनंतर मनसेनं स्पष्ट केली भूमिका

Raj Thackeray Party Reacts On BJP MNS Alliance: मुंबई महानगरपालिकेबरोबरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का यासंदर्भात मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. असं असतानाच मंगळवारी रात्री अचानक मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी गेले होते. या भेटीनंतर भाजपा-मनसेची युती पक्की मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र असं असतानाच आता या भेटीबद्दल पहिल्यांदाच मनसेनं अधिकृतरित्या आपली भूमिका मांडली आहे. फडणवीसांना भेटण्यासाठी त्यांच्या 'सागर' बंगल्यावर गेलेल्या मनसे नेत्यांपैकी एक असलेल्या संदीप देशपांडेंनी या भेटीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.

रात्री उशीरा बैठक

मंगळवारी (6 फेब्रुवारी) मनसेच्या प्रमुख नेत्यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' बंगल्यावर भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीसंदर्भात फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं तरी संदीप देशपांडेंनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भेटीमागील कारण काय होतं याबद्दल संदीप देशपांडेंनी माहिती दिली आहे.

होय! भेट झाली

"काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेट झाली मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती. भाजपा, शिवसेना आणि आमची विचारधारा सारखी आहे," असं संदीप देशपांडे यांच्यावतीने त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> 'राष्ट्रवादी अजित पवारांची' निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, 'हा निर्णय..'

सांगता येत नाही

आपली विचारसरणी ही भाजपा, शिवसेनेसारखी असल्याचं सांगताना संदीप देशपांडेंनी, "आमच्यात कुठलंही वितुष्ट नाही," असं सूचक विधान केलं आहे. "विचारांची देवाण-घेवाण महाराष्ट्राच्या राजकारणात होत असते," असं सांगताना संदीप देशपांडेंनी, "राजकारणात पुढे काय होईल हे सांगता येत नाही," म्हणत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेतच दिलेत.

नक्की वाचा >> मोठी बातमी! फडणवीसांच्या घरी रात्री गुप्त बैठक; भाजप-मनसे युती जवळपास निश्चित?

अशा भेटी होत राहतात

"राज ठाकरे लोकांची अनेक कामं घेऊन यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे. आम्ही देखील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना आमच्या कार्यक्रमांना बोलावलं आहे," असं सांगत संदीप देशपांडेंनी तिन्ही पक्षांमध्ये अशाप्रकारे नेत्यांना एकमेकांचं भेटणं वगैरे सुरुच असतं असं सांगितलं.

नक्की वाचा >> ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा

युतीबद्दलही स्पष्ट केली भूमिका

मनसे नेत्यांनी 'सागर' बंगल्यावर घेतलेल्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि मनसेची युती पाहायला मिळू शकते अशी राजकीय चर्चा सुरु असली तरी संदीप देशपांडेंनी युतीसंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरेच घेतील असं स्पष्ट केलं आहे. "स्वबळावर लढायचं की युती करायची याचा निर्णय राज ठाकरे घेतील," असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.