Loksabha Election 2024 : काही दिवसांपू्र्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भातील तारखा जाहीर केल्या. यावेळी देशातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं. महाराष्ट्रातही पाच टप्प्यांमध्ये विविध लोकसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
देशातील लोकशाहीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनानं यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केलं.
राज्यातील विविध मतदार संघांमध्ये मतदानास पात्र असणारे कामगार, अधिकारी आणि कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असले तरीही ही भरपगारी सुट्टी लागू होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून ही सुट्टी देण्यात येणार असून, सर्व उद्योग समूह, कंपन्या, संस्था, महामंडळांना लागू असणार आहे.
जिथंजिथं कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणं शक्य नसेल तिथंतिथं त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामातून 2 तासांची सवलत देण्यात यावी अशा सूचनाही शासनानं केल्या आहेत. अर्थात इथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीही आवश्यक असतील.
महाराष्ट्रात कोणकोणत्या तारखांना आहे मतदान?
निवडणुकीचा टप्पा | मतदारसंघ | मतदानाची तारीख |
पहिला टप्पा | रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर | 19 एप्रिल |
दुसरा टप्पा | बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी | 26 एप्रिल |
तिसरा टप्पा | रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले | 7 मे |
चौथा टप्पा | नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड | 13 मे |
पाचवा टप्पा | धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा) | 20 मे |