Chhagan Bhujbal: महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता समता परिषदेचा शिरकाव झाला आहे. राज्यामध्ये 3 ठिकाणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज विकत घेत उमेदवारीची तयारी केलीये. त्यामुळे या 3 मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका उमेदवारांना बसणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्यानंतर उमेदवारी जाहीर न झाल्याने छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. मराठा मतदारांना घाबरून ही उमेदवारी जाहीर करण्याची चर्चा आहे. त्यामुळे भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.
यात ओबीसींचा अपमान असल्याने समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी थेट नाशिक लोकसभेत उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत आलबेल नाही हे यातून स्पष्ट होतंय
नाशिकप्रमाणे संभाजीनगरमध्ये मनोज घोडके आणि ठाण्यामध्ये ओमप्रकाश सैनी या समता परिषदेच्या उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. हे तिघेही छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे या तीनही मतदारसंघांमध्ये ओबीसींच्या मतांचा टक्का जास्त असल्याने येथील मतदान निर्णायक ठरणारये.
याचा फटका अप्रत्यक्षपणे महायुतीला बसू शकतो. याबाबत छगन भुजबळ यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र त्यांच्या आदेशानुसारच पुढची भूमिका घेतली जाईल, असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केला आहे.
राज्यातील सरकारमध्ये सध्या तीन तिघाडा काम बिघड अशी परिस्थिती लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वत्र दिसून येतेय. मराठा-ओबीसी वादामध्ये भुजबळ यांच्या भूमिकेनंतर लोकसभा निवडणुकीत त्यांची ही तिरकी चाल आता ओबीसी राजकारणाला कुठली दिशा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.