Bhaskar Jadhav On Raj Thackeray: कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरेंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मनसैनिकांना साद घातली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी जुने मतभेद बाजूला ठेवून शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन भास्कर जाधवांनी केले आहे. राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत जात आहेत. त्यांना दिल्लीत जावे लागले कि बोलावून घेऊन इशारा देण्यात आला? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. काय बोलले भास्कर जाधव? जाणून घेऊया.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीला राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्यात यश आलंय. विशेष म्हणजे मनसेचा एकही खासदार लोकसभा निवडणूक लढवणार नसून राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी महायुतीचा प्रचार करताना दिसणार आहेत. यावर भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली.
मला राज ठाकरेंचे खुप वाईट वाटतयय त्यांच्या राजकीय कारकीर्दीची जी काय शोकांतिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होत आहेत. मला आनंद होत नाही. कारण त्यांच्यासारखा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. तिथपर्यंत पोहचलाय. मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. कारण त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणे ही अत्यंत वाईट बाब असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांचे उद्दिष्ट ओळखले पाहिजे. ते छोट्या मोठ्या पार्ट्या संपवत आहेत, असे जाधव यांनी सांगितले.
मला नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनम्र साद घालायची आहे. मनसैनिक हे मुळचे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सैनिक आहेत. तुम्ही मुळचे शिवसैनिक आहात. मतभेद काय झाले असतील ते विसरा आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पाठिशी उभे रहा. नेत्यांना काय निर्णय घ्यायचे आहेत ते घेऊ द्या. त्यांनी तो निर्णय मनापासून घेतला की दुसरं काय? याची वेगळी चर्चा सुरू आहे.
राज ठाकरेंना दिल्लीत जावे लागले की दिल्लीत बोलावून त्यांना इशारा देण्यात आलाय याची चर्चा सुरू असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते भास्कर जाधवांच्या हाकेला साद देणार की वार-पलटवार सुरु राहणार? हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.