लोकसभा निवडणूक २०१९: भाजप-शिवसेना युतीची प्रचारात आघाडी

युतीच्या प्रचाराला अमरावतीमधून सुरूवात झाली. 

Updated: Mar 15, 2019, 04:47 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: भाजप-शिवसेना युतीची प्रचारात आघाडी title=

अमरावती : भाजप-शिवसेनेनं प्रचारात आघाडी घेतली आहे. युतीच्या प्रचाराला अमरावतीमधून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीचा संयुक्त मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. विरोधी पक्षांमधील सर्व कॅप्टन्सनं माघार घेतल्याचा टोला त्यांनी शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना नाव न घेता लगावला. तर युती होण्यापूर्वी भाजपवर केलेली टीका ही जनतेच्या प्रश्नांवर असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीच्या समर्थनाचा पुनरूच्चार केला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली. भाजपने किमान शरद पवार यांना तरी पक्षात घेऊ नये, अशी मिष्किल टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. हल्ली वडील एका पक्षात असतात, मुलगा दुसऱ्या पक्षात असतो. शिवसेना-भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अडचण इतकीच आहे की टीका नेमकी कोणावर करावी? आज ज्यांच्यावर टीका करावी ते उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये येतात. अशाने उद्या सगळेच शिवसेना किंवा भाजपमध्ये आले तर समोर कोण शिल्लक राहणार? समोर लढायला कोणीच नसेल तर निवडणुकीत गंमत उरणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले आहे.