अहमदनगर : भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांचा अहमदनगरमध्ये पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसलीय. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? याबाबत उत्सुकता आहे. अरुणकाका जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावं चर्चेत आहेत. अरुणकाका जगताप किंवा प्रशांत गडाख यांच्यापैंकी आज सायंकाळी एकाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप यांचं नाव चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानं सर्वाधिक कोंडी राधाकृष्ण विखे पाटलांची झाली आहे. भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची यादी त्यांच्यासमोर उभी आहे. मात्र तरीही विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केला होता. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली आणि सुजय विखे पाटलांनी भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे आता प्रतिष्ठेचा विषय बनलेली ही जागा जिंकणं राष्ट्रवादीसाठीही महत्त्वाचं ठरणार आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केल्याप्रमाणे, सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ ते २९ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे.