स्वाती नाईक / कैलास पुरी, झी २४ तास, पनवेल-पिंपरी चिंचवड : मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांची प्रचारात दमछाक होताना दिसतेय. प्रचार करताना पार्थ पवार यांना प्रचाराचं वेळापत्रक पाळणं कठीण होत चाललंय. त्यामुळेच पार्थ पवारांना प्रचार करताना मोठी धावपळ करावी लागत आहे. मावळचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पनवेलच्या रस्त्यावर चक्क पळताना दिसले... ही कोणतीही मॅरेथॉन नव्हती. पार्थ पवारांची पळापळ होती वेळ गाठण्यासाठी...
राजकारणात नवखे असलेल्या पार्थ यांना प्रचाराचं वेळापत्रक पाळणं जरा कठिण होऊन बसलंय. त्यामुळे त्यांच्या प्रचारात विस्कळीतपणा आलाय. शरद पवार आणि अजित पवारांचा वक्तशीरपणा अजून पार्थमध्ये आलेला नाही. त्यामुळे वेळ गाठण्यासाठी पार्थ पवारांना पनवेलच्या रस्त्यावर अक्षरक्षः पळावं लागलं.
ही बाब फक्त पळण्यापुरतीच मर्यादित नाही. पनवेलच्या रेल्वे प्रवाशांशी संवाद साधताना त्यांनी सकाळच्या वेळेस पनवेल ते मुंबई प्रवास करणं अपेक्षित होतं. पण कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मुंबई ते पनवेल असा उलटा प्रवास केला. सकाळच्या वेळेस या लोकल रिकाम्या असतात. अशा रिकाम्या लोकलमधील किती प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला हा संशोधनाचा विषय होता.
पार्थ देवदर्शनाला गेले, मतांच्या बेगमीसाठी बैलगाडीही हाकली... किमान अजित पवारांसाठी तरी मतं द्या असं बोलण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आलीय.
पार्थ पवारांना राजकारणातले बारकावे समजण्यासाठी अजून खूप काळ जावा लागेल. राजकारणातले उन्हाळे पावसाळे पाहावे लागतील. निवडणूक जिंकण्यासाठी दादा नेत्याचा मुलगा असणं पुरेसं नाही हे आता पार्थ पवारांना पुरतं कळून चुकलं असेल.