सांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज

Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

राजीव कासले | Updated: Apr 16, 2024, 07:14 PM IST
सांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज title=

सरफराज सनदी, झी मीडिया, सांगली : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. त्यामुळं मविआची डोकेदुखी वाढलीय.  विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काँग्रेस उमेदवार आणि अपक्ष म्हणून त्यांनी एकूण तीन उमेदवारी अर्ज भरलेत. त्यांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी वसंतदादा पाटलांबद्दल बोलताना ते भावूक झाले. 

काँग्रेसबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र आता माघार घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केलीये...

विशाल पाटलांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) थेट आव्हान दिलंय. शेतकऱ्याच्या मुलानं खासदार व्हायचं नाही का? असा सवाल चंद्रहार पाटलांनी केला होता. त्यावर शेतकऱ्याच्या मुलाचा बळीही जाता कामा नये, असं सूचक वक्तव्य विशाल यांनी केलं.

विशाल पाटलांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेसला इशारा दिला. जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या त्या पक्षानं त्या थांबवाव्यात, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय. गद्दारी थांबवणं त्या पक्षाची जबाबदारी आहे, असे ठाकरेंनी म्हटलंय. तर विशाल पाटलांना एबी फॉर्म दिला नाही. त्यांच्याशी अजूनही संवाद सुरू आहे, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.

सांगलीचं राजकीय गणित
1952 ते 2019 पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह 19 निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने सोळा वेळा विजय साकारलाय. तर 1980 ते 2014 या काळात म्हणजे 34 वर्षात  वसंतदादा पाटील घराण्याचंच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी प्रतिक पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली. मात्र विशाल पाटील यांना संजयकाका पाटील यांनी धुळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं

दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ही म्हण सगळ्यांनाच माहित आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातलं हे भांडण भाजपचे उमेदवार, विद्यमान खासदार संजयकाका पाटलांच्या पथ्यावर पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही...