तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील चांदक ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यात मतदानाच्या राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वाई तालुक्यातील चांदक या गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. तब्बल २० दिवसांआड या गावाला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होत असते. पण मतं मागणाऱ्या राजकारण्यांना मात्र याचं सोयर-सुतक नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
आजपर्यंत निवडून दिलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने या गावाकडे लक्ष दिले नाही. फक्त निवडणुकीपूरताच येथील जनतेचा वापर केला जातोय, असा आरोप करत या सर्व महिलांनी आणि पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत यापुढील काळातील सर्वच निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे फलकदेखील गावात लावण्यात आले आहेत. आमच्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरविले आहे, अशा भावना ग्रामस्थांनी 'झी २४ तास'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
महिलांना पाण्यासाठी दूर अंतरावर पायपीट करावी लागते आहे. चांदकची लोकसंख्या १८०० वर असून पाणीपुरवठा टाकीची क्षमता ६०,००० लीटर आहे. या गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या दोन टँकरमधून येणारे पाणी टँकरच्या गळतीमुळे कमी मिळते. यामुळे ग्रामस्थांसोबत जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहेत. या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मयुरेश्वर येथे कवठे-केंजळ योजनेचे पाणी येते. परंतु चांदकपर्यंत ते पोहोचण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. यावर ग्रामस्थ नाराज आहेत.