लातूर : लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. यांत जवळपास ३ टक्के जिवंत पाणीसाठा तर २० टक्के मृतसाठा उपलब्ध आहे.
२०१६ च्या उन्हाळ्यात दुष्काळामुळे लातूरला पाणी पुरवठा करणारे हे धरण कोरडं पडलं होतं. त्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की आली होती. सुदैवाने गेली दोनही वर्षे दमदार पाऊस पडल्यामुळे हेच मांजरा धरण शंभर टक्के भरलं होतं.
एकदा धरण भरल्यावर तीन वर्षे पाणी पुरेल असा दावा लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी केला होता.मात्र त्यानंतरही धरणातील ७७ टक्के पाणी गायब होऊन फक्त २३ टक्केच पाणी मांजरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे लातूरसह अंबाजोगाई, केज, कळंब आदी शहरांवर पाणी संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.