प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्छीमार या नव्या संकटाचा सामना करतोय.
अलिबाग तालुक्यातील रेवस बंदरात या बोटी गेले महिनाभर अशाच नांगरून ठेवल्या आहेत. कोकणातील बहुतांश बंदरामध्ये अशीच स्थिती आहे. कारण कोकणातील मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. हे संकट निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. सध्या कोकण किनारपटटीवर एलईडी दिव्याच्या प्रकाशावर मासेमारी करण्याचा नवा धंदा सुरू झालाय. हे दिवे समुद्रात सोडून मासे आकर्षित केले जातात, त्यामुळे मासळी अलगद जाळयात सापडते.
या प्रकाराने पारंपरिक मच्छीमार पुरता मेटाकुटीला आलाय. एलईडी वापर करून मासेमारीमुळे माशांचे साठेच नष्ट होत आहेत. मच्छीमारांनी या संदर्भात आरडाओरड केल्यानंतर शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने एक परीपत्रक काढून त्यावर बंदी घातली.
शिवाय अशाप्रकारे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक अधिकारी तसेच तटरक्षक दलाला दिले. अशा नौकांचे सभासदत्व रद्द करून शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीही बंद कराव्यात, असे आदेश जारी केले. मात्र, कारवाई होत नसल्याने मच्छीमार बांधव संतापले असून गेले महिनाभर त्यांनी मासेमारी बंद ठेवली आहे.
लाखो रूपयांचे कर्ज काढून या मच्छीमार बोटी बांधल्या जातात. परंतु एलईडी लाईटचा वापर करून होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्न मच्छीमारांसमोर उभा ठाकला आहे.
डिझेलची विक्री होत नाही त्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थाही अडचणीत आल्या असून नोकरांचे पगार करणेही मुश्कील झाले आहे.
सरकारने यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. पर्सनेट मासेमारी, जेलीफीशची भीती आणि आता एलईडी लाईटने होणारी मासेमारी अशा तिहेरी जाळयात इथला मच्छीमार अडकला असून त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.