संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात वकिलाच्या हत्येने खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वकिलाचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यात बांधून ठेवले होते. पांडुरंग वस्तीमध्ये वकिलाचा मृतदेह एक घरात पोत्यात आढळून आला. बुधवारी सकाळी साडे बाराच्या सुमारास ही खुनाची घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी म्हटलं की, पांडूरंग वस्ती येथे एका व्यक्तीचे गेल्या पाच दिवसांपासून घर बंद होते़. घरातून दुर्गंधी येत होती. त्या घराच्या झाडा झडतीनंतर ही घटना उघडकीस आली.
दरम्यान मंगळवारी अॅड. राजेश कांबळे हे गायब असल्याची तक्रार सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने सोलापूर आयुक्तालयात देण्यात आली़ होती. बाहेरगावी केससाठी जातो म्हणून गेलेला आपला मुलगा परत आलाच नाही. खूप प्रयत्न केले त्याचा शोध घेतला. अखेर याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मृत राजेशचे वडील श्रीमंत कांबळे यांनी दिली होती.
या घटनेमध्ये साक्ष पुरावे महत्वाचे असून त्या बाबत पोलिसांनी दक्ष राहत ते गोळा करून सहकार्य करावे अशी अपेक्षा सोलापूर बार असोसिएशनचे अधक्ष्य संतोष नाव्हकर यांनी व्यक्त केली आहे.
सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी राजेश कांबळे यांचा मृतदेह पांडूरंग वस्ती येथील बंटी खरटमल याच्या घरातून ताब्यात घेत तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. बंटी उर्फ संजय खरटमल हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण विधिज्ञ राजेश कांबळे यांच्या संपर्कात आला होता. बंटीला शोधण्यासाठी पोलिसांच्या विविध टीम रवाना झाल्या असून त्यानंतरच या खुनाचं कारण समजू शकेल अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली आहे.