लातुरात विहीरी-तलाव कोरडे, पाण्याअभावी गणेश विसर्जन अशक्य

ज्यांना मूर्ती सांभाळणे शक्य नाही त्यांनी प्रशासनाला या मूर्ती दान करण्याचे आवाहन 

Updated: Oct 7, 2019, 04:31 PM IST
लातुरात विहीरी-तलाव कोरडे, पाण्याअभावी गणेश विसर्जन अशक्य title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : इतिहासात पहिल्यांदाच लातूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे यावर्षी विसर्जनच होणार नाही. कारण लातूरमध्ये म्हणावा तसा पाऊसच न पडल्यामुळे विहिरी, तलाव आणि जुने बारव हे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे गणपतीचे विसर्जन न करता अनेक सार्वजनिक गणेश मंडळ हे मूर्ती वर्षभर स्वतःकडेच ठेवणार आहेत. किंवा ज्यांना मूर्ती सांभाळणे शक्य नाही त्यांनी प्रशासनाला या मूर्ती दान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. 

देशात आणि राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना लातूर जिल्ह्यासह मराठवाडा अद्यापही तहानलेलाच आहे. याचा फटका नागरिकांसह, पशु-पक्ष्यांना आणि आता चक्क विघ्नहर्ता गणपती बाप्पालाही बसत आहे. कारण लातूर शहरात ज्या सिद्धेश्वर मंदिरातील बारव आणि विहिरीत विसर्जन केले जाते ते कोरडेठाक पडले आहेत. लातूर जिल्ह्यात पावसाची म्हणावी तशी हजेरी न लागल्यामुळे नद्या, ओढे, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे लातूर शहरातील जवळपास ५००हुन अधिक सार्वजनिक मंडळाचे विसर्जन न करण्याचा निर्णय शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. 

लातूरच्या शिवाजी चौकातील २५ वर्षांपासून बसणाऱ्या लातूरचा राजा गणपती मंडळासह जवळपास सर्वच मंडळांनी वर्षभर मूर्ती जतन करण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या विहिरीतील पाणी हे पिण्यासाठी वापरायचे असल्यामुळे नागरिकांनीही घरगुती गणेशाचे घरातच बादलीत पाणी घेऊन विसर्जन करावे किंवा त्याच मूर्तीला जतन करावे. तसेच ज्या मंडळांना मूर्ती जतन करणे शक्य नाही त्यांनी प्रशासनाला किंवा मूर्तिकारांना मूर्ती दान करावेत  करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे.  

एकीकडे २०१६ च्या दुष्काळात लातूरला रेल्वेने पाणी आणल्यामुळे लातूरची जगभर चर्चा झाली. किंबहुना आताही तसाच काहीसा प्रसंग गणेशोत्सवात लातूरवर पुन्हा एकदा आली आहे.  पावसाअभावी गणेश विसर्जनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे गणपती विसर्जन न करण्याची ही बहुधा देशाच्या  किंवा देशाबाहेरच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जाता जाता लातूरसह मराठवाड्याला जोरदार पावसाने भिजवून टाकण्याची प्रार्थना सर्वच जण करीत आहेत.