लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड

Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 

राजीव कासले | Updated: Sep 30, 2024, 02:08 PM IST
लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड (Nanded) जिल्हयात उघडकीस आलाय. पुरुषांच्या नावावरील पैसे उचलून केंद्र चालक फरार झाला. हदगाव तालुक्यातील मनाठा इथल्या सीएससी केंद्रचालकाने हा प्रकार केलाय. सचिन मल्टीसर्व्हिसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो म्हणुन त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड (Aadhar Card) बँक पासबुक जमा केले.

लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला

मात्र अर्ज भरताना लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरले. महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करुन त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले. पैसे जमा झाल्यानंतर त्या त्या पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे उचलले. स्वतःचे रोजगार हमी योजनेचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असे सांगून त्याने पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले. गावतील सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले होते.

शंका आल्याने अलीमने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा लाडकी बहिण योजनेचे ते पैसै असल्याचे त्याला कळाले आणि सीएससी केंद्रचालकाने केलेला हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्र चालक सचिन थोरात फरार झालाय. मनाठा गावातील जवळपास 37 जणांची त्याने फसवणुक केल्याचे उघड झाले. ठगाणे आणखी किती जणांची फसवणूक केली याबाबत जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे

आमदार जयकुमार गोरेंची बंदूक अॅक्शन

दरम्यान, सातारा:म्हसवड इथं आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास 20 हजाराहून अधिक महिला उपस्थिती लावली. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी व्यासपीठावर येऊन बंदुकीची ॲक्शन करत निशाणा साधलाय. बंदुकीच्या ॲक्शन विषयी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर हा रोख शासनाने राबवलेल्या योजनांच्या विरोधात काम करणारे आणि मान खटाव तालुक्यातील विकासाच्या आड येणाऱ्यांवर होता. समजणे वालो को इशारा काफी है असे सांगत बारामतीच्या दिशेने हात वारे करत त्यांनी टीका केली.