Ganeshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून, आता या उत्सवासाठी अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. इथं पावसाची सुरुवात झाली, की गणेशोत्सव आणखी जवळ आल्याचीच अनुभूती प्रत्येकाला होते आणि मग बेत आखले जातात ते म्हणजे गावाकडे जायचे.
गावाला कधी जायचं, कसं जायचं, गावाकडे जाण्यासाठी रेल्वेतिकीटाचं रिझर्व्हेशन कधी करायचं इथपासून सर्वच गोष्टींचा हिशोब मांडला जातो आणि पाहता पाहता ही लगबग वाढत जाते. येत्या काही दिवसांमध्ये अनेक कोकणवासिय कुटुंबांमध्ये अशी लगबग पाहायला मिळणार असून, त्याची सुरुवात होणार आहे रेल्वेच्या गणपती स्पेशल जादा रेल्वे गाड्यांसंदर्भातील चौकशीनं.
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तवादरम्यान होणारी गर्दी आणि प्रवाशांचं या माध्यमाला असणारं प्राधान्य लक्षात घेता आता कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून या मार्गावर जादा गाड्या सोडण्याची मागणी केली जात आहे. (Konkan railway Ganpati special)
रेल्वेमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी पनवेल ते खेड, वसई ते चिपळून, दिवा ते चिपळूण, दादर ते रत्नागिरी, पनवेल ते रत्नागिरी, डहाणू ते पनवेल या मार्गावर अनारक्षित मेमू चालवण्याची मागणी प्रवासी समितीनं केली असून, 24 कोचची तुतारी एक्स्प्रेस आणि दादर, रत्नागिरीदरम्यान डबल डेकर अनारक्षित ट्रेन चालवण्याची मागणीसुद्धा रेल्वे प्रवासी सेवा समितीनं केली आहे. आता या मागण्या पाहता प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कोकण रेल्वे आणि एकंदर रेल्वे विभागाकडून यासंदर्भात कोणता निर्णय होतो आणि त्याचा प्रवाशांना नेमका कसा फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.