गुहागर : समुद्राकाठी रहाणा-या आणि प्रामुख्याने मासेमारी करणा-या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. गुहागरच्या वेळणेश्वर गावातील कोळी बांधवांनी देखील नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात साजरा केला. महिलांनी गाणी म्हणत समुद्राला नारळ अपर्ण केला. पूजा केल्यानंतर कोळी महिला किना-यावर फुगड्या घालतात. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात.
दरवर्षी कोकणात नारळीपौर्णिमेलाच कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात ढकलतात. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किना-यालगत राहणा-या लोकांसाठी महत्त्वाची असते. आजच्या या पूजेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो तसच पावसाचा जोर ओसरु लागतो आणि कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात.