कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांवर अरेरावी

महसूलमंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात 

Updated: Aug 12, 2019, 05:46 PM IST

कोल्हापूर : महसूलमंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळमध्ये पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यासोबत अरेरावी केल्याचं पुढे आले आहे. पूरग्रस्तांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी काही पूरग्रस्तांनी केली. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी चूप बसायचे अशा शब्दात दम भरला. चंद्रकांत पाटलांनी मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा केला आहे

तक्रारी करुन काही होणार नाही. प्रशासन बिचारे चोवीस चोवीस तास झटत असतात असे चंद्रकांत पाटील सांगत होते. तेव्हा संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. त्यावेळी अरे चूप असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी समोरच्याला गप्प केले. 

या संदर्भात झी 24 तासकडे त्यांनी खुलासा केला. काहीतरी गैरसमज होतोय. जवळजवळ 5 टन साहीत्य घेऊन मी शिरोळला पोहोचलो. वेगवेगळ्या निवारा केंद्रात मी गेलो. काय योजना आहेत त्या मांडण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार मी एक एक योजना मी मांडत होतो. सूचना मांडा तक्रारी करु नका असे मी हात जोडून म्हटले. दरम्यान सातबारे वाहून गेले असे एकाने म्हटले तर त्याला होरे बाबा ते पण करु असे मी म्हटले अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी दिली.