कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराची भीती, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर अलमट्टीतला विसर्ग वाढवला

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर कर्नाटकातल्या अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Updated: Sep 8, 2019, 10:36 PM IST
कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराची भीती, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर अलमट्टीतला विसर्ग वाढवला title=

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर कर्नाटकातल्या अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली. १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग अलमट्टीमधून होत होता. तो आता २ लाख २० हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला काहीसा दिलासा मिळणार आहे.

कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नदीकाठावर पुराचा धोका निर्माण झाला आहे. आता कुठे सांगली पुरातून सावरतेय. तोच पुन्हा पुराचं संकट निर्माण झालं आहे.

कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं सांगलीला पुराचा धोका निर्माण झालाय. कोयना धरणाचे सहा  दरवाजे ८ फुटापर्यंत उघडण्यात आलेत. त्यामुळे कोयनेतून ७० हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. आगोदरच महापुरामुळे नदी काठ खचला आहे, नदी काठावरची माती आणि शेती वाहून गेल्याने, कृष्णेच पात्र मोठं झालं आहे, तर दुसरी कडे कृष्णाकाठच्या लोकांची मन पुराच्या भीतीने खचली आहेत.