Kolhapur Balumama News : असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानला भेट देणाऱ्यांची संख्या दर दिवसागणिक वाढत आहे. इथं येऊन बाळूमामांची महती आणि प्रचिती अनुभवणाऱ्यांपैकी किंवा बाळूमामा पूजनीय असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानच्या कारभारात बराच चुकीचा प्रकार सुरु असल्याचा आरोप करण्याता आला असल्यामुळं ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपास गेला की भररस्त्यात वादाला हाणामारीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. प्रकरणाचं गांभीर्य पाहता आता बाळूमामा देवस्थान समितीवर त्रिसदस्यीय प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला शिवराज नायकवडी यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आदमापुरचे सरपंच विजय गुरव यांनी ट्रस्टी नेमणुकीविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती ज्यानंतर हा सर्व प्रकार चर्चेचा विषय ठरला.
काही दिवसांपूर्वी आदमापूरच्या सरपंचपदी असणाऱ्या विजय गुरव यांनी बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये चुकीच्यापद्धतीनं चालणाऱ्या कारभारासंदर्भात वकिलांची भेट घेतली होती. तेव्हाच समितीचे विश्वस्त, त्यांचे समर्थक आणि गुरव यांच्यात वाद विकोपास जाऊन हाणामारी झाली. यावेळी विश्वस्तांच्या समर्थकांकडून गुरव यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. गुरव देवस्थान समितीच्या बदनामीसाठी हे सर्व करत असल्याचे आरोप विश्वस्तांच्य समर्थकांनी लावले होते. तर, खुदद् विजय गुरव यांनी मात्र ते आरोप फेटाळून लावत देवस्थान समितीतीच्या कारभार आणि विश्वस्त नेमणुक प्रक्रियेकडे लक्ष वेधलं होतं.
बाळूमामाचे अवतार म्हणवून घेणाऱ्या मनोहर मामा भोसले यांच्यावर झालेला कारवाईनंतर विश्वस्तांकडून आपल्यावर हल्ला होत असल्याचा खळबळजनक आरोपही गुरव यांनी केला होता. दरम्यान, सध्या देवस्थानातून येणारी ही सर्व वृत्त, काही महिन्यांपूर्वी देवाच्या नावानं सुरू असणारा लुटमारी आणि फसवाफसवीचा प्रकार ही सर्व परिस्थिती पाहून पाहता भक्तांकडून तीव्र नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे. देवाची प्रचिती एका बाजुला आणि हे वाद एका बाजूला.... हा सर्व प्रकार तातडीनं थांबवला पाहिले अशीच मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.