एव्हरेस्टनंतर 'गिरिप्रेमी'ला 'माऊंट कांचनगंगा' सर करण्याचा ध्यास

'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन - २०१९'साठी गिरिप्रेमी संस्थेची २७ जणांची टीम सज्ज 

& Updated: Jul 17, 2018, 12:20 PM IST
एव्हरेस्टनंतर 'गिरिप्रेमी'ला 'माऊंट कांचनगंगा' सर करण्याचा ध्यास title=

मुंबई : 'आनंदासाठी गिर्यारोहण' असं ब्रीदवाक्य असलेल्या 'गिरिप्रेमी' या संस्थेनं एक पाऊल पुढे टाकलंय. 'स्वच्छ पर्वत - स्वच्छ हिमनदी' या ध्येयांतर्गत गिरिप्रेमीनं 'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन - २०१९' या योजनेची आखणी केलीय. ८६८६ मीटर उंची असलेलं कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं तर भारतातील सर्वात उंच शिखर आहे. 'कांचनगंगा एक्स्पीडीशन' ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम असल्याचं या मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे यांनी म्हटलंय.

अष्टहजारी चढाया...

मे २०१२ मध्ये अशाच एका नागरी मोहिमेंतर्गत 'गिरिप्रेमी' संस्थेच्या तब्बल आठ शिलेदारांनी जगातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एव्हरेस्ट'सर करण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होतं. त्यानंतर 'गिरिप्रेमी' हे नाव सगळ्या महाराष्ट्राला आणि देशालाही परिचित झालंय. 'माऊंट एव्हरेस्ट'नंतर माऊंट लोत्से (८५१६ मीटर उंच), माऊंट मकालू (८४८१ मीटर उंच), माऊंट चो - ओयू (८२०१ मीटर उंच), माऊंट धौलागिरी (८१६७ मीटर उंच) आणि माऊंट मनस्लू (८१५६ मीटर उंच) अशा महत्त्वकांक्षी मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वीरित्या पूर्णही केल्या... आणि याचमुळे १४ पैंकी ६ अष्टहजारी शिखरांवर यशस्वीरित्या चढाई करणारी 'गिरिप्रेमी' ही भारतातील एकमेव नागरी संस्था ठरलीय.

'कांचनगंगा'चं आव्हान 

'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन - २०१९'साठी गिरिप्रेमी संस्थेची २७ जणांची टीम सज्ज झालीय. मोहीमेचे प्रमुख उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची टीम प्रत्यक्षात 'माऊंट कांचनगंगा'ची चढाई करणार आहे. चढाईसाठी अत्यंत कठिण समजल्या जाणाऱ्या 'कांचनगंगे'च्या शेवटच्या कॅम्पपासून शिखरावर पोहचण्यासाठी सलग २७ ते २८ तास लागतात. गोठवणाऱ्या थंडीत हे आव्हान पार करणं अत्यंत कठिण आहे. तसंच कॅम्प २ ते कॅम्प ३ पर्यंत हिमवादळाचा धोकाही अधिक आहे.

भारताच्या बाजूनं चढण्यास बंदी

हिमालयाच्या पूर्व भागात भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवर असलेल्या कांचनगंगा हे पाच टेकड्यांचं शिखर... सुरक्षा कारणास्तव तसंच काही स्थानिक धार्मिक कारणांमुळे या शिखरावर भारताच्या बाजुनं चढण्यास परवानगी नाही. भारतातून सिक्कीमच्या बाजुनं या शिखरावर जाता येऊ शकतं. परंतु, 'कांचनगंगेच्या' पाच शिखरांवर देव वसलेत, अशी स्थानिक 'लिप्चा' जमातीची समजूत आहे. तसंच आत्तापर्यंत भारताच्या बाजूनं चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं या बाजूनं चढण्यास बंदी घातलीय.

'इको ट्रेकर्स'चा सहभाग

या संपूर्ण मोहिमेसाठी जवळपास सव्वा दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आर्थिक हातभार लावण्यासोबत देशभरातील ट्रेकरही दोन मार्गांनी 'इको ट्रेकर' म्हणून 'बेस कॅम्प'पर्यंत या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. पहिला मार्ग भारतातून सिक्कीमच्या गोचाला पासपासून तर दुसरा मार्ग म्हणजे नेपाळच्या ताप्लेजुंगपासून बेस कॅम्पपर्यंत जाता येईल. भारताकडून जाण्यासाठी १२ दिवसांचा तर नेपाळकडून १४ दिवसांचा हा ट्रेक असेल. १२० हून अधिक हिमनद्यांचं उगमस्थान स्वच्छ करण्याचा ध्यास यानिमित्तानं 'गिरिप्रेमी'नं घेतलाय. 'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन २०१९' मोहिमेंतर्गत या परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरण विकास यावर भर देणार असल्याचं झिरपे यांनी म्हटलंय.

कांचनगंगा अभयारण्य हे असंख्य वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या प्रजातींचं माहेघर आहे. या ठिकाणी आढळणारी जैवविविधता ही खूप मोठ्या संशोधनाचा पाया ठरू शकते. याच विचारातून गिरिप्रेमीच्या संघातील गिर्यारोहक इथल्या जैवविविधतेचा अभ्यास करून निरीक्षणंही नोंदविणार आहेत. मुख्य म्हणजे, स्वच्छता प्रकल्प हा केवळे मोहिमेपुरता मर्यादित राहणार नसून या संदर्भात संपूर्ण वर्षभर संस्थेकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.