बायको सोडून गेल्याचा राग, माथेफिरुचा कोयत्याने केडीएमटी बस चालकावर हल्ला

बायको सोडून गेल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका व्यक्तीने हातात कोयता घेऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला. कल्याण पश्चिमला ऐन गर्दीच्यावेळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण केडीएमटीच्या बसचालक आणि कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत आरोपील पकडून दिलं.

Updated: Aug 31, 2023, 10:18 PM IST
बायको सोडून गेल्याचा राग, माथेफिरुचा कोयत्याने केडीएमटी बस चालकावर हल्ला title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण पश्चिममधल्या रामबाग परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू व्यक्तीने भर रस्त्यात कोयत्याने (Koyta) कल्याण-डोंबिवली म्यून्सिपल ट्रान्सपोर्टच्या (KDMT) बस चालकावर हल्ला केला. बस चालकाने प्रतिकार केल्याने या व्यक्तीने कोयत्याने बसच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बायको सोडून गेल्याच्या मानसिक तणावातून या व्यक्तीने कोयत्याने हल्ला करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी (Kalyan Police) दिली आहे. 

कल्याण च्या मधुरीम सर्कल मध्ये ट्राफिक जॅम मध्ये ही बस अडकली होती. याच वेळेस  बाळू साबळे हा हातात कोयता घेऊन आला आणि हल्ला करायला लागला. यावेळी त्याला बस चालकाने प्रतिकार केल्याने त्याने बसच्या काचा फोडल्या. बस चालक आणि बस कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत माथेफिरुला पकडलं. बाळू साबळे असं या माथेफिरुचं नाव असून त्याला महात्मा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बाळू साबळे ऐन गर्दीच्या वेळी हातात कोयता घेत गाड्यांची तोडफोड सुरु केली. दोन एसटी आणि केडीएमटीच्या एका बसच्या काचा त्याने कोयत्याने फोडल्या. अचानक घडलेल्या घटनेने बसमधल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी आरोपी बाळू साबळेला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

मोबाईल चोर अटकेत
दरम्यान, कल्याणमध्ये गर्दीचा फायदा घेत रेल्वे प्रवाशांच्या मोबाईल चोरणारे सराईत चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकल मेल एक्सप्रेस मध्ये चढताना प्रवाशांचे मोबाईल चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल लंपास करत होते. या पार्श्वभूमिवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सूरु केला. राज्य राणी एक्सप्रेस मेल मध्य चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने प्रवशाचा मोबाईल चोरल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती.

रेल्वे पोलिसांनी तत्काळ या चोरट्याचा शोध सुरु केला.काही तासातच एक व्यक्ती रेल्वे स्थानकावर संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ चोरी केलेला मोबाईल आढळला. जहीर शेख असा या चोरट्याचं नाव असून जहीर हा सराईत चोरटा आहे. तो मूळचा भुसावळ इथं राहणारा आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या अजय आल्हाट या सराईत चोरट्याला देखील बेड्या ठोकल्यात. या दोघांच्या विरोधात देखील या आधी देखील रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.