इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Updated: Aug 13, 2017, 07:14 PM IST
इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी  title=

पालघर : इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय. गोवणेमधल्या आदिवासी शाळेसाठी इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी वस्तु रुपात तब्बल 8 लाखांचा निधी जमवलाय.

गोवणेतल्या जिल्हा परिषद आदिवासी शाळेसाठी विजय पावबाके यांनी हा निधी जमवला. शाळेसाठी ज्या वस्तूंची गरज आहे त्याच्या अर्जाची एक सॉफ्ट कॉपी त्यांनी तयार केली. ई लर्निंग किट, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, वॉटर कुलर, प्युरिफायर, कम्प्युटर, ग्रंथालयासाठी पुस्तकं, खेळणी, छत्र्यास पादत्राणं आणि सायकली अशा बाबींचा त्यात समावेश होता.

या वस्तूंचं ऑनलाईन कोटेशनही त्यांनी जोडलं. मुंबईतल्या सामाजिक संस्था, एनजीओ, रोटरी क्लब्स सर्वांनाच ईमेल केला. काहीच दिवसांत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बे व्ह्यु यांच्याकडून शाळेला वॉटर कुलर विथ प्युरीफायर पुरवणार असल्याचा रिप्लाय आला. पावबाकेंच्या परिश्रमाचं ते पहिलं फळ होतं.  

हळूहळू शाळेसाठी वस्तु रुपात सुमारे ८ लाखांचा निधी गोळा झाला. शाळेसाठी पावबाके यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे आज शाळेची पटसंख्याही चांगली आहे. जिल्ह्यात शंभर टक्के डिजिटलाईझ शाळा फारच कमी आहेत त्यात गोवणे शाळेचाही नंबर लागतो.