ट्रेडिंगच्या नावाखाली असा घातला लाखोंचा गंडा... आताच सावध व्हा नाहीतर....

ट्रेडिंगसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थांबा तुमच्यासोबतही हे घडू शकतं... आताच व्हा सावध!

Updated: Dec 4, 2021, 08:34 PM IST
ट्रेडिंगच्या नावाखाली असा घातला लाखोंचा गंडा... आताच सावध व्हा नाहीतर.... title=

वाल्मिक जोशी, झी 24 तास जळगाव: बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खाते तयार करून नफा परत करण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील सेवानिवृत्त एलआयसी अधिकार्‍याची साडे सहा लाखांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील चंद्रशेखर देशमुख यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आले. संबंधितांनी देशमुख यांचा विश्वास संपादन करत बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खात्यात तयार करण्यास सांगून सदर ट्रेंडिंग खात्यांमध्ये आभासी नफा दाखवून त्यांना त्या नफ्याच्या 50 टक्के रक्कम देशमुख यांना भरण्यास सांगितले. 

देशमुख यांनी संबंधितांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन 6 लाख 54 हजार 189 रुपये पाठवले. देशमुख यांनी संबंधितांना पैसे परत मागितले असता फोनवर बोलणार्‍या अनोळखींनी देशमुख यांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेतले. डिसेंबर 2020 ते 29 नोव्हेंबर 2021 या कालावधीत फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं.

देशमुख हे बँकेत गेले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. बँकेतून त्यांचे अकाउंट बंगलोर पोलिसांनी सील केले असल्याची माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी जळगाव सायबर सेल कडे तक्रार केली आहे. 

माझ्या उतार वयामध्ये जी माझी फसवणूक झालेली आहे. त्यासंदर्भात मी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून माझी व्यथा मी झी 24 तास समोर मांडतो आहे यांनी मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली आहे.