डिजीटल इंडियाचे भयाण वास्तव! PDW काम करत नसल्याने जळगावच्या सरपंचाने असा निर्णय घेतला की पोलिसही हादरले

सर्वसामन्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सरपंच असूनही मागणी पूर्ण होत असल्याने जळगाव येथील सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.  

Updated: Jul 24, 2023, 04:58 PM IST
डिजीटल इंडियाचे भयाण वास्तव! PDW काम करत नसल्याने जळगावच्या सरपंचाने असा निर्णय घेतला की पोलिसही हादरले   title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : एकीकडे देश चंद्रयान मोहिमेच्या माध्यामातून गगन भरारी घेत आहे. तर, दुसरीकडे आजही सर्वसामान्यांना मुलभूत सोई सुविधांसाठी देखील झगडावे लागत आहे. डिजीटल इंडियाचे भयाण वास्तव जगळावमध्ये समोर आले आहे (Jalgaon News).  रस्त्याच्या मागणीसाठी सरपंचाने सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या सरपंचाचा जीव वाचला आहे. 

पाठपुरावा करुनही रस्त्याचे काम होत नसल्याने सरपंच संतापले

रुपेश गांधी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संरपंचाचे नाव आहे. रुपेश गांधी हे बोदवड तालुक्यातील हरणखेड येथील सरपंच आहेत. रुपेश गांधी यांनी निमखेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी वारंवार  केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्यावरही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने निमखेडा गावाजवळ स्वतःवर डिझेल टाकत पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे.
हरणखेड ते निमखेडे रस्ता अरुंद असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस घसरून रस्त्याच्या खाली उतरली होती. त्यावेळी मोठा अनर्थ होण्यापासून टळला होता. वेळीच गावकऱ्यांनी धाव घेत ट्रॅक्टरच्या माध्यमातून एसटी वर खेचून काढली होती. या सर्व घटना प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही तसेच अनेक निवेदने देऊन प्रशासनातर्फे कोणताही दखल घेतली जात नसल्याने हरणखेड येथील सरपंचांनी चक्क अंगावर डिझेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला असून मागणी पूर्ण न झाल्यास यापुढे यापेक्षाही मोठे पाऊल उचलले जाईल असा इशारा देण्यात त्यांनी दिला आहे.

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर युवकाचा आत्मदहनाच प्रयत्न

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर एका युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा स्त्री रुग्णालयच्या आवारभिंतीला लागून असलेल्या व्यवसायिकांच्या अतिक्रमित दुकाने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने तोडण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी ही कारवाई झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर व्यावसायिक रवी सरदार या युवकाने पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ हजर होऊन, सदर युवकाचे प्राण वाचविले व युवकाला ताब्यात घेतले. सदर युवकाने यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिष्ठाता आरती कुलवाल आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा जबाबदार असल्याचे सांगितले आहे. तर, या व्यापाऱ्यांनी व्यापार पुन्हा सुरू कारणासाठी मागणी केली आहे.