विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : बंडखोरीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. त्यात चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. युतीप्रमाणे आघाडीच्या उमेदवारांनाही बंडखोरांचा ताप सहन करावा लागणार आहे.
माघारीच्या दिवशी मुक्ताईनगर मतदारसंघात अनपेक्षित हालचाली घडल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना युती असताना या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ऍड. रवींद्र पाटील यांनी माघार घेत चंद्रकांत पाटलांना छुपा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
गेल्या वेळी एकनाथ खडसेंना जोरदार टक्कर देणारे चंद्रकांत पाटील यावेळी देखील रोहिणी खडसेंची वाट बिकट करतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. चोपडा मतदारसंघात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसून आली.
याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगदीश वळवींविरुद्ध अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्याचप्रमाणे सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरोधात भाजपचे अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची बंडखोरी आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली आहे. याठिकाणी शिवसेनेचे किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी केली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे तर सेनेचे लक्ष्मण पाटील यांनी युतीत बंडखोरी केली आहे.