Crime News : गुंडांची धिंड, जळगाव पोलिसांचा पॅटर्नच वेगळा

नागरिकांना धमकावत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची झाली अशी अवस्था

Updated: Nov 17, 2021, 10:42 PM IST
Crime News : गुंडांची धिंड, जळगाव पोलिसांचा पॅटर्नच वेगळा title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : खून, मारामारी, चोरी, दरोड्यांबरोबरच जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी चांगलीच कडकं भूमिका घेतली आहे. दोन सराईत गुन्हेगारांची गावभर धिंड काढून जनतेच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुकामध्ये गेल्या काही दिवस पासून काही गुंडांनी दहशत माजवली होती. मुक्ताई नगर तालुक्यातील कुरहा काकोडा गावात पवार गँगने खून, मारामाऱ्या, दारोड्यांसारख्या गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. सामान्य नागरिकांनाही धमकावत या गँगने दहशत निर्माण केली होती. त्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेत होतं.

या गुंडांच्या कारनाम्यांची मुक्ताई नगर पोलिसांनी गंभीर दखल घेत कठोर कारवाईचा निर्णय घेतला. मुक्ताई नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल खताळ यांनी या दहशत माजवणाऱ्या गुंडांना अटक केली. इतकंच नाही तर गावकऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी त्यांची गावभर धिंडही काढली.

मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये वायरल झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केलं आहे.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि सर्व सामान्य जनतेला निर्भयपणे वावरता यावं याच उदेशाने ही कारवाई केली गेली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.