तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 27, 2023, 08:23 PM IST
तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...  title=

जळगाव : राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावमधल्या दिव्यांग शाळेला भेट दिली. यावेळी त्यांचं अनोख्या पद्धतीन औक्षण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री फडणवीसांना एका दिव्यांग मुलीनं पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. त्यानंतर फडणवीसांनी शाळेची पाहणी करुन तिथल्या मुलांशी संवादही साधला. या अनुभवाने देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी याचा व्हिडिओ (Video) ट्विट करत भावूक संदेश दिला आहे. 

'अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा...'
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय... 'आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." 

ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले -

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात
जळगावमध्ये पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरु होती. तेव्हाच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयातून  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी रोहिणी खडसेंनाही ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान काळे झेंडे दाखवण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

भाजपचं 'मिशन निवडणूक'
महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45, तर विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजप आणि मित्रपक्षांनी निश्चित केलंय... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा विजयाचा संकल्प करण्यात आला. मित्रपक्षांपैकी कुणीही नाराज नाहीत, असं बावनकुळेंनी बैठकीनंतर सांगितलं. तर समन्वयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला शंभूराजे देसाई , चंद्रकांत पाटील, उदय सामंतही उपस्थित होते.