चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान

चांद्रयान 3 ही भारतासाठी अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.  

Updated: Jul 16, 2023, 09:25 PM IST
चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान   title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : संपूर्ण भारतासाठी अभिमान वाटावा अशा ‘चांद्रयान-3’ने (Chandrayaan-3 ) आवकाशात झेप घेतली आहे. चांद्रयान-3’ ही मोहीम यशस्वी झाल्याने प्रत्येक भारतीयाच्या माना या उंचावल्या आहेत. महत्वाचे म्हणजे‘इस्रो’च्या या मोहिमेमध्ये जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान दिले आहे. चांद्रयान-3 मध्ये जळगावात तयार झालेलं एचडी वर्षा नोझल्स वापरण्यात आले आहेत.

जळगावमध्ये तयार झाला महत्वाचा पार्ट

चांद्रयान मोहिमेच्या ‘लाँच पॅड’मध्ये जळगावातील एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीत उत्पादित नोझल्स वापरले आहेत. यानाचे प्रक्षेपण होताना अत्याधिक आवाज आणि व्हायब्रेशन तयार होतात. यामुळे चांद्रयान आणि त्यामधील विविध उपकरणांना धोका संभवू शकतो. त्यामुळे हा आवाज विशिष्ट मर्यादेच्या आत राखणे गरजेचे असते. या नोझल्स प्रणालीत प्रती मिनीट अडीच लाख लिटर या वेगाने पाण्याचे फवारे बाहेर पडतात. त्यामुळे हा आवाज नियंत्रित करता येतो. यासाठी जळगावमध्ये उत्पादित झालेले 88 नोझल्स वापरण्यात आले आहेत. 

या मोहिमेत जळगाव चा देखील महत्वाचा वाटा असल्याने प्रत्येकाने अभिमान व्यक्त केला आहे. तसेच देशाच्या इतक्या महत्वाच्या मोहिमेत आम्हाला सहभाग घेता आला त्यामुळे आम्हाला अभिमान वाटत असून भविष्यात देखील अशी संधी मिळाली तर नक्की अजून चांगले काम करू अशी प्रतिक्रिया एचडी फायर प्रोटेक्ट मिहीर घोटीकर यांनी दिली आहे.

भारतासाठी अभिमानास्पद क्षण

भारताचं महत्त्वाकांक्षी चांद्रयान तीन यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावलंय. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून 14 जुलै रोजी दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे 16 व्या मिनिटाला रॉकेटमधून चांद्रयान-3 वेगळं झालं आणि चांद्रयान मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. आता पुढच्या काही दिवसांत  यान पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरेल. त्यानंतर चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. साधारणपणे 23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.