नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. पाल (Lizard) असलेल्या बाटलीतलं पाणी प्यायलाने एका विद्यार्थिनीला (Student) विषबाधा (Poisoned) झाली. पण धक्कादायक म्हणजे ही घटना ऐकून तिच्या आणखी चार मैत्रिणींना उलटी आणि चक्कर आली. एकूण पाच जणींना मळमळ, उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात (Training Center) ही घटना घडली.आता चारही मुलींवर जालन्यातील (Jalana) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून सर्व मुलींची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
काय आहे नेमकी घटना?
बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीने पाण्याच्या बाटलीने तिथे बसवलेल्या फ्रिजमधील पाणी प्यायली. पाणी पिल्यानंतर पाण्याची बाटली रिकामी झाली. पण बाटलीत पाल असल्याचं या मुलीने पाहिलं आणि तिने हातातली बाटली खाली फेकली.या मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्यानं प्रशिक्षण केंद्रातील इतर मुलींनी तिच्याकडे धाव घेऊन काय झालं म्हणून विचारणा केली.
त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत पाल असल्याचं तिने तर मुलींना सांगितलं. किळसवाणा प्रकार ऐकून तिथल्या पाच मुलींना मळमळ,उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. ही माहिती समजल्यानंतर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी तातडीने या सर्व मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यातील एका मुलीला लगेच सुट्टी देण्यात आली तर सध्या चारही मुलींवर अजूनही उपचार सुरु आहे. दरम्यान चौघींचीही तब्बेत स्थिर असल्याची माहिती प्राचार्यांकडून देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रातील फ्रीजमध्ये पाल कशी आली, त्याची साफसफाई करण्यात आली नव्हती, याची प्रशिक्षण केंद्र स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.
धावत्या दुचाकीवर मद्यपान
दरम्यान, नागपूरमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धावत्या दुचाकीवर मद्यपान करणाऱ्या तरुणांचा हा व्हिडिओ आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरु केला आहे. दोन तरुण दुचाकी चालवत मद्यपान करत आहे.. धक्कादायक म्हणजे सीताबर्डीच्या गर्दीच्या भागातून जाताना दोघांचे हे कृत्य सुरू असून दुचाकी चालवणारा तरुण आणि पाठीमागे बसलेला तरुण दोघे आळीपाळीने मद्यप्राशन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे..
दुसरा व्हिडिओ ही नागपुरातला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीच्या पाठीमागे बसून प्रवास करताना हातात दारूचा पेग घेऊन दारू रिचवत चालला आहे. दोन्ही व्हिडिओ viral झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही घटनेतील मद्यपिंचे शोध सुरू केला आहे...