Jalana lokSabha Constituency : जालना... मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं शहर... राजूरचा गणपती हे पवित्र देवस्थान... जालना म्हणजे स्टील सिटी... बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळई बनवणारे कारखाने इथं मोठ्या प्रमाणात आहेत. जालना म्हणजे मोसंबीचा बालेकिल्ला... हजारो हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. जालना म्हणजे सीड सिटी... शेतीशी संबंधित बियाणं बनवणा-या कंपन्या इथं आहेत. या शहराला उद्योगाची पार्श्वभूमी असली तरी विविध समस्यांनी चांगलाच विळखा घातलाय. जालना शहरात 12 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. मेडिकल कॉलेज मंजूर झालंय, मात्र इमारतीचं बांधकामच सुरू झालेलं नाही. कृषीमाल, फळ निर्यातीसाठी ड्रायपोर्ट तयार आहे, मात्र अजून तो प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्यानं शेतकरी हतबल आहेत. जालना-खामगाव रेल्वेचं स्वप्न अजून साकार झालेलं नाही.
जालनाचं राजकीय गणित
जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. 1996 पासून इथं कायम भाजपचा खासदार निवडून येतोय. १९९९ पासून रावसाहेब दानवे लोकसभेत जालनाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 2009 मध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा ८ हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडेंनी तब्बल २ लाख मतांनी पराभूत केलं. तर 2019 मध्ये दानवेंनी काँग्रेसच्या औताडेंना तब्बल सव्वा तीन लाख मतांनी पाणी पाजलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे.
तब्बल पाच टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंचं जालन्यात चांगलं वर्चस्व आहे. आता विजयाचा सिक्सर मारण्यासाठी भाजपनं त्यांना पुन्हा मैदानात उतरवलंय. तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला सुटली असून, कल्याण काळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. जालन्यात दलित, मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल 77 हजार मतं मिळवली होती. यावेळी वंचितचे उमेदवार प्रभाकर ब्राह्मणे किती मतं घेतात, याची उत्सूकता आहे. रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा सामना सध्या तरी एकतर्फी दिसतोय. तगडा प्रतिस्पर्धी नसल्यानं पुन्हा एकदा दानवेंच्या पदरात विजयाचं दान पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.