कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा गुळाचे सौदे बंद पडलेत. दहा टक्के हमाल दरवाढ मिळावी, अशी मागणी हमालांनी केली आहे. पण गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांनी मात्र दहा टक्के हमाली दरवाढ देतो, पण लेखी हमी द्या, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. हमाल आणि व्यापारी यांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे आजचे गूळ सौदे बंद राहिलेत. परिणामी गूळ उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा कचाट्यात सापडला आहे. नेमके हमालांनी काम बंद आंदोलन केल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. हमाल आणि गूळ खरेदी करणारे व्यापारी यांच्यामधील हमाल वाढीचा वाद न मिटल्याने गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक होऊन बाजार समितीमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे फळे, भाजीपाला विकत घेऊन जाणारे छोटे व्यापारी देखील अडकून पडलेत.
सध्याची हमाली कमी असल्याचे हमालांचे म्हणणे आहे. वारंवार विनंती करून देखील गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांनी हामाली वाढ केलेली नाही. गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे हमाल आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने हस्तक्षेप करत गुळाचे सौदे सुरू राहावेत यासाठी प्रयत्न केले. पण हमाल आणि गूळ खरेदीदार व्यापारी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
व्यापारी आणि हमाल यांच्यात झालेल्या करारानुसार दहा टक्के हमाली वाढ द्या अशी हमालांनी भूमिका घेतली आहे. महापुरामुळे गावाकडे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे आम्हाला परवडत नसल्याचे हमालांचे म्हणणे आहे. हमाल वाढ देतो पण लेखी हमी द्या, अशी व्यापाऱ्यांची भूमिका घेतली. याला हमालांचा तीव्र विरोध केला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये हमालांची संख्या ५०० तर १५० गूळ खरेदीदार व्यापाऱ्याची संख्या आहे. १० किलोला पाच रुपये हमालाना हमाली मिळते. बाजार समिती मध्ये दिवसाला २० ते २५ हजार रव्याची आवक होते. मात्र, गूळ सौदे बंद राहिल्याने दिवसाला १ ते १.५ कोटींची उलाढाल ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे.