इस्रायल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू, महाराष्ट्राशी होता खास संबंध

Israel Hamas War : इस्रायलकडून हमासविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारतीय वंशाच्या एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये लढताना 34 वर्षीय भारतीय वंशाचा इस्रायली सैनिक मारला गेला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 8, 2023, 04:47 PM IST
इस्रायल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू, महाराष्ट्राशी होता खास संबंध  title=

Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. दोन महिने झाले तरी दोन्ही बाजूंकडून युद्ध सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या संघर्षात मंगळवारी 34 वर्षीय भारतीय वंशाच्या इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने भारतीय ज्यू हेरिटेज सेंटरच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या सैनिकाचा महाराष्ट्राशी देखील संबंध असल्याचे समोर आलं आहे.

इस्रायल हमास युद्धात इस्रायलच्या बाजूने लढताना आतापर्यंत 86 सैनिक मारले गेले आहेत. यामध्ये पाच भारतीयांचा देखील समावेश आहे. अशातच आता 7 डिसेंबर रोजी या युद्धात इस्रायली राखीव सैनिक मास्टर सार्जंट गिल डॅनियल्स यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय ज्यू समुदायाच्या सदस्यांनी ही माहिती दिली. मास्टर सार्जंट गिल डॅनियल्स हे अश्दोदचे रहिवासी होते. गिल डॅनियल यांची मंगळवारी गाझामध्ये हत्या करण्यात आली आणि बुधवारी त्यांच्या गावी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती भारतीय ज्यू समुदायातील लोकांनी दिली.

इस्रायली सुरक्षा दलांनी पुष्टी केली की गाझा पट्टीमध्ये लढताना मारल्या गेलेल्या दोन सैनिकांमध्ये गिल डॅनियल यांचा समावेश आहे. भारतीय ज्यू हेरिटेज सेंटरने म्हटले की, "या क्रूर युद्धात इस्रायलने आपले अनेक सैनिक गमावले आहेत. या युद्धात इस्रायलने राष्ट्राच्या सन्मानासाठी लढताना अनेक पुत्र आणि कन्या गमावले आहेत. आज, आम्ही आणखी एक इस्रायल संरक्षण दलाचा सैनिक, मास्टर सार्जंट गिल डॅनियल्स यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतो. तो जोएल आणि मजल यांचा मुलगा होता."

सार्जंट गिल डॅनियल हे इस्रायलच्या बेने समुदायातून आले आहेत, ज्यांचे मूळ भारतातील महाराष्ट्रत आहे. इस्त्राईलमधल्या अश्दोद शहरातील माकीफ गिमेल हायस्कूलमध्ये 'क्लास ऑफ 2007' चे गिल डॅनियल्स हे विद्यार्थी होते. यानंतर त्यांनी इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठातून मास्टर्स ऑफ फार्मसी पदवी पूर्ण केली. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर गिल कर्तव्यावर परतले होते. मात्र 7 डिसेंबर रोजी त्यांचा या युद्धात मृत्यू झाला.

दरम्यान, इस्त्रायली हल्ल्यात आतापर्यंत 16,248 लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये 7,112 मुले आणि 4,885 महिलांचा समावेश आहे. हमासने 100 हून अधिक ओलिस ठेवलेल्या आमच्याकडे सोपवलं आहे. पण 138 लोक अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत ज्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हॅगरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.