मोठी बातमी । आता राज्यभरातील स्कूल बसेसची तपासणी

RTO to launch inspections of school buses from 31 July : आता स्कूल बसेसची तपासणी होणार आहे.  

Updated: Jul 28, 2022, 12:17 PM IST
मोठी बातमी । आता राज्यभरातील स्कूल बसेसची तपासणी title=
संग्रहित छाया

पुणे : RTO to launch inspections of school buses from 31 July : आता स्कूल बसेसची तपासणी होणार आहे. राज्यभरातील स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केले आहेत. वाहनांमधून अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या राज्यभरातील स्कूलबसेसची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. 31 जुलैपर्यंत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

विद्यार्थी सुरक्षेच्यादृष्टीने स्कूलबससाठी नियम घालून देण्यात आले आहेत. यामध्ये बसचे योग्यता प्रमाणपत्र, बसमधील आसनव्यवस्था आदींबाबत अनेक तरतुदी आहेत. मात्र, सद्य:स्थितीत नियमभंग करुन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसेस शिवाय इतर वाहनांमधून अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातील परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी स्कूलबसेसच्या तपासणीचा आदेश जारी केला आहे. यात राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांकडून तपासणी मोहीम हाती घेण्याचे सांगण्यात आले आहे. 

यामध्ये विशेषतः शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील आसनव्यवस्था, 'स्पीड गव्हर्नर' नसलेली वाहने, योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने आणि स्कूलबसेसशिवाय इतर वाहनांमधून सुरु असलेली अवैध वाहतूक आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. यानंतर ही सर्व माहिती राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येणार आहे.