मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यानंतर महागाईचा चांगलाच भडका उडताना दिसत आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात मिळत आहे. सध्या भाज्यांबरोबर कोथिंबीरची आवक कमी झाली आहे. त्यात इंधन दरवाढ यामुळे कोथिंबीरची किंमत अव्वाच्यासव्वा वाढलेली दिसून येत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोने विकली जात आहे. ( Rs 400 per kg of cilantro ) तर कोथिंबीरची जुडी 100 ते 120 रुपये दराने विकली जात आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नवी आवक सुरू होताच कोथिंबीर दरात घट होईल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. भाज्यांच्या किंमतीही भडकल्या आहेत. आता तर कोथिंबीरने भडका उडवला आहे. त्यामुळे शहरात कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. ठोक बाजारात 250 ते 300 रुपये किलोने कोथिंबीर खरेदी केली जात आहे. तर किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोवर गेली आहे.
राज्यात सध्या लांबलेल्या पावसाने स्थानिक पिकांना चांगले झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोथिंबीर जागेवरच खराब झाली आहे. परिणामी, सध्या कोथिंबीरचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलिंडर 920 रुयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता भाजीपाल्यानेही नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे महागाईचा कहर पाहायला मिळत आहे.
नागपुरात कधी नव्हे इतकी कोथिंबीर महाग झाली आहे. 40 रुपयांची कोथिंबीरची पेंडी 100 रुपयांच्यावर गेली आहे. सध्या मध्यप्रदेश, छिंदवाडा, नांदेड येथून कोथिंबीरची आवक नागपुरात होत आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने देखील कोथिंबीरच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.