आतिष भोईर, कल्याण : आजपासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आज कल्याण डोंबिवली शहरांची पाहाणी करत आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि इतर पोलीस अधिकारीही उपस्थित होते. या पाहणी दरम्यान फणसळकर यांनी महापालिका आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासह या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने काम करत असल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अधिक संपर्कात आल्यानंतर वाढते. संपर्क आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. नागरिकांनी आज ज्याप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद 12 तारखेपर्यंत द्यावा आणि सहकार्य करावे. तसेच अनावश्यक घराबाहेर पडू नये, सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी म्हटलं की, 'पोलीस आणि प्रशासन एकत्र येऊन काम करणार असून लोकांना घरात राहण्यासाठी आवाहन करणार आहे. हा बंद आमच्यासाठी नाही तर तुमच्या आणि शहराच्या हितासाठी घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिला तर निश्चित आपण कोरोनावर मार करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत हा संसर्ग थांबवायचा आहे. या 10 दिवसात घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा.'
गेल्या 24 तासात कल्याण-डोंबिवलीत 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज सर्वाधिक 560 रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संक्रमिताचा आकडा 4785 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 3090 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.