दीपक भातुसे, अमर काणे, झी मीडिया, नागपूर : 'आपण राहुल गांधी आहोत, सावरकर नाही' या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या वाक्यामुळे सध्या वाद निर्माण झालाय. भाजपसह तमाम सावरकरवादी त्यांच्यावर टीका करतायत, तर बचावात काँग्रेसही आक्रमक झाल्याचं दिसतंय. अशातच आता नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात बीए प्रथम वर्षाला सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र समाविष्ट करावं असा प्रस्ताव आलाय. अभ्यास मंडळच्या पुढच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो.
यावरून आता वाद निर्माण झालाय. सावरकरांवरून वाद सुरू असताना नेमका हा विषय आल्यानं त्यावर टीका होतेय. सावरकर यांच्या भारताबद्दल असलेल्या योगदानाबद्दल इत्यंभूत माहिती मराठी माणसाला मिळालीच पाहिजे, अशी माझी मागणी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नागपूर विद्यापीठाने माझी जन्मठेप हे पुस्तक आणायचं ठरवलं असेल, तर मी त्यांचं कौतुक करतो. पण त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन सावरकरांचा संपूर्ण इतिहास सगळ्या विद्यापीठांमध्ये द्यावा, असं आव्हाड म्हणाले आहेत.
अभ्यासक्रमात बदल सुचविण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीतील एक सदस्य संजय पोहरकर यांनी हा प्रस्ताव मांडलाय. सावरकरांचं आत्मचरित्र हे तरुणांमध्ये देशभक्ती जागवणारं आहे. यापूर्वीही सावरकरांचं समग्र साहित्य एमएच्या अभ्यासक्रमात होतं. नेमका आताच का प्रश्न विचारला जातोय, असा पोहरकर यांचा सवाल आहे.
सावरकरांचं साहित्य अभ्यासायला विरोध असायचं कारण नाही. मात्र आता वाद सुरू असतानाच नेमका हा प्रस्ताव आल्यामुळे त्याच्या टायमिंगबाबत शंका उपस्थित केली जातेय. आता हा प्रस्ताव मंजूर होतो का, हे पाहायचंय.