रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्प पुन्हा चर्चेत; संशोधक आणि अभ्यासकांनी केली पाहणी

कातळशिल्पांमुळे प्रकल्प होणार नाही, बारसूतील जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. तर, कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. 

Updated: Jun 13, 2023, 07:30 PM IST
रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्प पुन्हा चर्चेत; संशोधक आणि अभ्यासकांनी केली पाहणी  title=

Ratnagiri Barsu Refinery : रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्प पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रत्नागिरीत बारसू सड्यावरील कातळशिल्पांची देशभरातील संशोधक आणि अभ्यासकांनी पाहणी केली. यावेळी  खासदार विनायक राऊतही उपस्थित होते.  कातळशिल्प ही देशासाठी आणि जगासाठी देणगी असून बारसूच्या सड्याचं संवर्धन होण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटल आहे. 

कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी

बारसू दौ-यादरम्यान उद्धव ठाकरेंनी बारसू येथील सड्यावरील कातळशिल्पांची पाहणी केली. या अमूल्य ठेव्याचं जतन व्हायला हवं असं ते म्हणाले.. तसंच या कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी सांगीतलं. 

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसाठी  महाराष्ट्रातील 12 किल्ले आणि 10 कातळशिल्पांची निवड 

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावासाठी राज्यातील 12 किल्ले आणि 10 कातळशिल्पांची निवड भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केली. किल्ल्यांमध्ये शिवनेरी, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, प्रतापगड, गाळणा,  राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पद्मादुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा किल्ल्यांचा समावेश आहे. तर रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांतील 57 गावांमध्ये सड्यावर 1200 कातळशिल्पे कोरलेली आहेत, त्यांचा ही प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

गुप्तधनासाठी भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर 

बुलढाण्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा आडगावराजा इथला भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आडगावराजातील या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मोठ्या प्रमाणात गुप्तधनासाठी खोदकाम केलं जात आहे. यामुळे संबंधितांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

महादेवाच्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती

बीडमध्ये भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती सापडलीय. गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी हे उभारले असून, या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. खोदकाम करून पिंडी बाजूला काढण्यात आलीय. त्या पिंडीखाली कासवाची सोन्याची मूर्ती आढळून आलीय. ही मूर्ती जवळपास एक तोळ्याची आहे. मूर्ती मिळाल्याची माहिती मिळताच भाविकांनी गर्दी करत या सोन्याच्या मूर्तीची पूजा केली. नवीन मंदिराची निर्मिती केल्यानंतर पुन्हा ही मूर्ती पिंडीखाली ठेवण्यात येणार आहे.

घराच्या बांधकामासाठी खोदकामावेळी सापडल्या तोफा आणि ऐतिहासिक साहित्य

नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. चार ते पाच फूट लांबीच्या या तोफा पंचधातूच्या असून त्यात एक तोफ पितळीची आहे. या तोफांचे वजन जवळपास सह क्विंटल आहे. प्रशासनानं या तोफांचा पंचनामा केला असून, या तोफा गावातच ठेवण्याचा आग्रह गावकऱ्यांनी धरलाय.