परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; मुंबईसह 'या' जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार

Maharashtra Weather Update:  वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे  

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 25, 2024, 07:01 AM IST
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; मुंबईसह 'या' जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार title=
IMD Issues Red Alert for These Maharashtra Districts Check Weather Forecast for 25 september

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी आठवडाभर पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मंगळवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळं आज बुधवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड व पुण्यासह घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून (२३ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यंदा सलग १४ व्या वर्षी परतीचा प्रवास विलंबाने सुरू झाला. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू झाला. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला आहे. राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर, मुंबईत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास हा 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 

बुधवारसाठी अलर्ट

रेड अलर्ट – रायगड, पुणे
ऑरेंज अलर्ट – नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट – उर्वरित महाराष्ट्र