आपण उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नाही: श्रीपाद छिंदम

.....

Updated: Jun 11, 2018, 08:39 AM IST
आपण उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नाही: श्रीपाद छिंदम title=

मकरंद घोडके, झी मिडिया, अहमदनगर: मनपातील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नसल्याचा दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि शिवजयंती विषयी अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम यांना भाजपाने महापौर पदावरून पदच्युत केलं. तसंच, पक्षातूनही बडतर्फ केल होतं. आता तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या श्रीपाद छिंदम यांना विभागीय आयुक्त कार्यालयाने नगरसेवक रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना छिंदम याने आपण नगरसेवक पदाचा आणि उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नसल्याचा खुलासा केलाय. मात्र, या संदर्भात कॅमेऱ्यासमोर बोलण्यास किंवा लेखी खुलासा करण्यास छीदम त्यांनी नकार दिला आहे.

नगरविकास विभागाकडून छिंदमला नोटीस

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य केल्याने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर करून त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचाही ठराव झाला आहे. या ठरावानुसार मनपा प्रशासनाद्वारे नगरविकास खात्याला छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर छिंदमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास विभागाने त्याला नोटीस पाठवली आहे. त्या नोटिशीला उत्तर देताना त्याने आपण राजीनामाच दिला नसल्याचे म्हणणे मांडले आहे. यावरून नवे आरोप-प्रत्यारोपसत्र सुरू झाले आहे.

लेखी खुलासा करण्यास छींदमचा नकार

'माझ्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरसेवकपद रद्द करणे बेकायदेशीर आहे, माझ्या कोणत्याही संमती वा स्वाक्षरीशिवाय माझ्याविरुद्ध बनावट कागदपत्रांआधारे षडयंत्र रचले गेले आहे, माझी स्वतःची सही असलेला कोणताही उपमहापौरपदाचा राजीनामा मी महापौरांकडे दिलेला नाही, उलट ज्या तारखेचा हा राजीनामा दाखवला जात आहे, त्या तारखेस मी पोलिस व न्यायालयीन कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी सही करून देणे शक्य नव्हते,  असे त्याने म्हंटले आहे . मात्र या संदर्भात मुलाखत देण्यास किवा लेखी खुलासा करण्यास छींदम याने नकार दिलाय.